मिऱ्या किनाऱ्यावरचे ‘बसरा स्टार’ जहाज अखेर भंगारात काढण्याची कार्यवाही सुरू
रत्नागिरी :-
मिऱ्या किनाऱ्यावर तब्बल पाच वर्षे खडकात अडकून राहिलेले ‘बसरा स्टार’ जहाज अखेर भंगारात काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. लाटांच्या सततच्या माऱ्यामुळे या जहाजाचे दोन तुकडे झाले होते. आता हे जहाज कापण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, मिऱ्या किनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामातील अडथळाही दूर होणार आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडले ‘बसरा स्टार’ जहाज ३ जून २०२० रोजी भरकटले आणि मिऱ्या किनाऱ्यावरील खडकात अडकले होते. सुमारे ३५ कोटी किमतीचे असलेले हे जहाज खाऱ्या पाण्याचा सततचा मारा आणि दुर्लक्षामुळे सडले. त्यामुळे आता ते केवळ दोन कोटी रुपयांमध्ये भंगारात काढले जात आहे. एम. एम. शिपिंग कॉर्पोरेशन कंपनी कस्टम आणि मेरीटाइम बोर्डाची कन्सल्टंट म्हणून हे जहाज बाहेर काढण्याचे काम करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क झाला असून, त्यांनी ४० लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर हे जहाज अधिकृतपणे भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या जहाजाचे मोठे तुकडे झाल्यामुळे आणि आता ते कापून काढले जात आहेत. लवकरच हे जहाज किनाऱ्यावरून हटविले जाणार आहे. जहाज हटविताच मिऱ्या बंधाऱ्याचे कामाला गती येणार आहे.


