मुंबईतल्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी आलेली पाच मुले समुद्रात बुडाली असल्याचे वृत्त हाती आले आहे.रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन मुलांना वाचवण्यात यश आले. पण उर्वरित तीन मुलं अद्याप बेपत्ता आहेत.मुंबईमध्ये रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे शोध मोहिमेत अडथळा येत आहे.
विसर्जन करत असताना ही मुलं खोल समुद्राच्या दिशेने गेली. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ते पाचही जण बुडाले. मुलं बुडत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात येता त्यांनी तात्काळ त्यांचा शोध घेत दोघांना वाचवले. या दोन्ही मुलांना उपचारासाठी कपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरीत तीन जण अद्याप बेपत्ता आहे त्यांचा शोध सुरु आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस,पालिकेचे कर्मचारी,अग्निशनम दलाचे कर्मचारी,तटरक्षक दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि शोधकार्य सुरु केले पण तीन मुलं अद्याप बेपत्ता आहेत .