मुळस – बांबर्डे रस्ता बनला धोक्याचा कॉरिडॉर
दोडामार्ग
मुळस–बांबर्डे मार्गासह दोडामार्ग–तिलारी या महत्त्वाच्या राज्यांमध्ये जोडणाऱ्या रस्त्यावर सुरू असलेलं रुंदीकरण हे विकासाचं काम कमी आणि जनतेच्या सुरक्षिततेशी केलेला उघड उघड खिलवाड जास्त ठरत आहे. खोदाईला कुठलाही योग्य प्लॅन नाही, सुरक्षिततेचे उपाय नाहीत, चिखलाचं साम्राज्य आणि असमतोल मातीचा भराव या सर्वांनी रस्त्याची अवस्था अक्षरशः ‘अपघातप्रवण दलदल’ बनवली आहे. दोन्ही बाजूंनी वाहने चालतात पण क्रॉसिंगची सोय शून्य; कुठे खोल चर, कुठे उंच भराव, तर कुठे पूर्ण चिखल या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे नशिबावर सोपवलेली मोहीम!

हे पण वाचा मालदीव कॅरम विश्वचषकात प्रशांत मोरे तिसऱ्यांदा विश्वविजेता!
नियमांनुसार रुंदीकरणादरम्यान तात्पुरता ट्रायल बेस रस्ता तयार करून वाहतूक सुरळीत ठेवणं बंधनकारक आहे. पण ठेकेदाराने हा महत्त्वाचा टप्पाच वगळून थेट खोदाई सुरू केली. जे काम सुरूच होऊ नये असं काम आधी सुरू केलं आणि सुरक्षिततेचं काम जे आधी व्हायला हवं होतं ते अजून दिसतही नाही. या निष्काळजीपणाला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून “जनतेच्या जीवाशी असा खेळ कसा चालू ठेवला जातो?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस यांनी या कामातल्या बेफिकीरीवर जोरदार टीका केली. त्यांनी प्रशासनाला स्पष्ट विचारणा केली की या मार्गावर अखेर किती पुलांची मंजुरी आहे, पुलांचं काम कोणत्या पद्धतीने होणार, गटार आणि ड्रेनेज व्यवस्था काय असेल आणि रस्त्यावर योग्य दिशादर्शक फलक कुठे बसवले जाणार? ही माहिती जनतेपासून लपवली जाणार असेल तर हा रस्ता नेमका कोणाच्या सोयीसाठी रुंद केला जातोय? असा सरळ प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गोवा–महाराष्ट्र–कर्नाटक यांना जोडणारा हा महत्त्वाचा प्रवासी आणि मालवाहतूक मार्ग असल्याने या अव्यवस्थित, धोका वाढवणाऱ्या कामामुळे तिन्ही राज्यांच्या नागरिकांच्या दैनंदिन जगण्यावर थेट परिणाम होत आहे. आजारी व्यक्तींच्या ने-आणीत विलंब, विद्यार्थ्यांच्या प्रवासात गैरसोय, प्रवाशांची दमछाक आणि वाहनचालकांची सतत अपघाताची भीती सगळंच या गैरजबाबदार कामामुळे ठप्प झालं आहे.
जनतेला त्रास देणं थांबवा, सुरक्षिततेला प्राधान्य द्या, असा स्पष्ट इशारा रविकिरण गवस यांनी प्रशासन व ठेकेदाराला दिला. त्यांनी मागणी केली की सर्वप्रथम नियमांनुसार ट्रायल बेस रस्ता तयार करावा, त्यानंतर सर्व कामाची माहिती जाहीर करावी आणि मगच मुख्य कामाला परवानगी द्यावी. त्यांच्या म्हणण्यानुसार ठेकेदाराचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाची ढिम्म गती यामुळे संपूर्ण रस्ता एक ‘धोक्याचा कॉरिडॉर’ बनला असून परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी दोघांवरही आहे. सध्या या रस्त्याची अवस्था पाहता एक गोष्ट स्पष्ट दिसते—विकासाच्या नावाखाली काम सुरू आहे, पण तिथे जनतेची सुरक्षितता मात्र कोणीही गांभीर्याने घेताना दिसत नाही.


