राज्यात पावसाने विश्रांती घेती असतानाच पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे दक्षिण आणि ईशान्य भारतात काही ठिकाणी गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. येत्या 1 आणि 2 नोव्हेंबरदरम्यान राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि कोकण भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या 1 आणि 2 नोव्हेंबरला कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सोलापूर आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात 4 ते 10 नोव्हेंबर दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. ते जास्त तीव्र न होता पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ह्याचा परिणाम म्हणून 6 ते 11 नोव्हेंबर दरम्यान ईशान्य मोसमी पाऊस कोसळ्याची शक्यता आहे .तसेच दक्षिण भारतात देखील पाऊस पुन्हा सक्रिय होईल. महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे


