बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक वेगाने वाढला, तर येत्या २६ मे रोजी ‘यास’ चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.भारतातील काही राज्यात आता यास चक्रीवादळाचा धोका देण्यात आला आहे.पूर्व किनारपट्टीवर ज्या ज्या राज्यांना ‘यास’ चक्रीवादळाचा धोका आहे, त्या राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीसाठी NDRF च्या तुकड्या देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.आरोग्यविषयक यंत्रणा सज्ज ठेवण्याचे देखील निर्देश मार्गदर्शक सूचनांमध्ये देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून पश्चिम बंगाल आणि ओडिशासोबतच आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबारमधील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. चक्रीवादळाच्या मार्गात येणाऱ्या प्रदेशामध्ये असलेल्या रुग्णालयांमधील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तौते चक्रीवादळामुळे बचावकार्य आणि पुनर्वसन कार्यासाठी एनडीआरएफनं आपल्या काही टीम पाठवल्या होत्या. त्या टीम माघारी बोलावण्यात येत आहेत.मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमारांनी आपल्या बोटी पुन्हा किनाऱ्यावर आणाव्यात, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.२२ आणि २३ मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच ‘यास’ हे नाव ओमेन देशाने दिलं आहे.