यूपी क्रीडा विभागाला कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सहारनपूर घटनेवर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले आहेत.
केंद्रीय क्रीडा मंत्रीअनुराग ठाकूर यांनी मंगळवारी, सहारनपूर येथे एका कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कबड्डीपटूंसाठी बनवलेले अन्न शौचालयात ठेवल्याचा आरोप असलेल्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उत्तर प्रदेश क्रीडा विभागाला दिले असल्याचे सांगितले आहे. खेळाडूंना टॉयलेटमधून जेवण घेतानाचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये खेळाडूंच्यासाठी बनवलेले अन्न टॉयलेटमध्ये ठेवलेले दिसत होते. व्हिडिओमध्ये खेळाडूंना शौचालयात ठेवलेला भात वाढण्यात येत होता आणि खेळाडूही वाढलेले अन्न शौचालयातून घेऊन निमूटपणे जात होते. या पद्धतीने वाढले जाणारे अन्न दूषित आणि जंतूंनी भरलेलेच असणार.
“आरोपी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत. तसेच यापुढे कधीही या कंत्राटदाराला काम न देण्याचे निर्देश दिले आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी ही सूचना सर्वत्र देण्यात आली आहे ,” असे ठाकूर म्हणाले. “आम्ही यूपीच्या क्रीडा विभागाला या प्रकरणात आरोपींविरुद्ध कठोर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत., भाजप सरकारच्या काळात क्रीडा सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत. तुम्ही एनआयएस पटियाला किंवा देशभरातील इतर कोणत्याही क्रीडा केंद्रात गेलात, तर तुम्हाला दिसेल की तेथे पोषण आणि तेथे उपलब्ध असलेले अन्न पंचतारांकित हॉटेलशी तुलना करता येते,” असेही ते म्हणाले
शौचालयात ठेवलेल्या अन्नाचा व्हिडिओ इंटरनेटवर आल्यानंतर सहारनपूरचे क्षेत्रीय क्रीडा अधिकारी अनिमेश सक्सेना यांना उत्तर प्रदेशच्या क्रीडा संचालनालयाने निलंबित केले आहे. “क्रीडा विभागाच्या मुख्य सचिवांनी एका पत्राद्वारे ‘ सहारनपूर येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कबड्डीपटूंसाठी असलेल्या जेवण शौचालयात ठेवल्याचे फोटोत दिसत आहे. त्यामुळे विभाग आणि सरकारच्या विरोधात प्रचंड बदनामी होत आहे. प्रादेशिक अधिकारी आणि भागधारकांच्या सदोष कारभारामुळे ही घटना घडली असून मुख्य सचिवांनी सहारनपूरचे प्रादेशिक क्रीडा अधिकारी अनिमेश सक्सेना यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत असे पत्राद्वारे जाहीर केले आहे
सहारनपूरचे प्रादेशिक क्रीडा अधिकारी अनिमेश सक्सेना यांच्याकडून या घटनेबद्दल स्पष्टीकरण मागितले होते, पण ते याबद्दल स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत, असे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे, उत्तर प्रदेश सरकारी नोकर (शिस्त आणि अपील) नियम, 1999 नुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे .या घटनेनंतर अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी रजनीश कुमार मिश्रा म्हणाले, “मी सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळाडूंना अस्वच्छ स्थितीत जेवण दिल्याचे पाहिले. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मला तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. जे काही तथ्य आहे ते समोर येईल. माझ्या अहवालात प्रकाश टाकण्यासाठी, मी ते डीएमकडे सादर करेन.”जिल्हा दंडाधिकारी अखिलेश सिंह पुढे म्हणाले, “सहारनपूरमध्ये एक राज्यस्तरीय स्पर्धा होती. यामध्ये मोठ्या संख्येने मुलांनी भाग घेतला होता. त्यामुळे व्यवस्थेमध्ये कदाचित गोंधळ झाला असेल.परंतु या घटनेचा अहवाल तयार केला जात आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि एका आठवड्यात दोषी अधिका-यावर कारवाई केली जाईल.


