राजापूर– तालुक्यातील कात्रादेवी येथे आंबा खरेदीसाठी आणलेली तब्बल १२ लाख ६५ हजारांची रक्कम बॅगेसह लंपास करणार्या चोरट्यास २४ तासाच्या आत गजाआड करण्यात नाटे पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. विशेष म्हणजे चोरीची सर्व रक्कम हस्तगत केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , चोरीची ही घटना १० मे रात्री १० ते ११ मे २०२२ रोजी मध्यरात्री १२.४३ वाजता या कालावधीत घडली होती. रेहान बाबामियाँ मस्तान ( ३४ वर्षे , रा. मिरकरवाडा,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत नौशाद महामुद शेकासन ( ५६ , रा. राहत अपार्टमेंट, रत्नागिरी शहर) यांनी नाटे पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, त्यांचा आंबा खरेदीचा व्यवसाय असुन, ते कात्रादेवी, ता. राजापुर येथे तंबु मारुन आंबा खरेदी व त्याचे लोड करण्यासाठी ९ कामगारांसह तंबुत रहात होते. आंबा खरेदीसाठी आणलेली रोख रक्कम १२ लाख ६५ हजार २४० रुपये त्यांनी त्यांचे जवळ काळया बॅगेत ठेवलेली होती.ती बॅग आपल्या डोक्याखाली ठेवुन झोपलेले असताना, कोणीतरी अज्ञाताने बॅग चोरुन नेली होती.
या गुन्हयातील आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सागरी पोलीस ठाणे नाटे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अंमलदार यांचे पथक तयार करुन तपास चालू होता.या पथकाने कात्रादेवी चौक येथील ऑपरेशन नेत्रा अंतर्गत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याचे फूटेज तपासले.तेव्हा त्यांना गुन्हयातील आरोपी रेहान मस्तान निष्पन्न झाल्यावर चौकशीकामी त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले तसेच त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली रोख रक्कम १२ लाख ६५ हजार २४० रुपये हस्तगत करण्यात आली आहे.
ही कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील,पोलिस हवालदार विकास चव्हाण, शशांक फणसेकर, नरेंद्र जाधव , पोलिस नाईक प्रसाद शिवलकर , कुशल हातिसकर ,पोलिस शिपाई गोपाळ चव्हाण , चालक विनोद रसाळ सर्व नेमणूक सागरी पोलीस ठाणे नाटे तसेच पोलिस हवालदार सुभाष भागणे शांताराम झोरे, बाळू पालकर , सागर साळवी , चालक पोलिस शिपाई अनिकेत मोहिते सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांनी केली आहे.