रत्नागिरी- महाराष्ट्र सागरी अधिनियमन 1981 अंतर्गत पर्ससीन मासेमारीच्या अनुषगांने शासनाने 05 फेब्रुवारी 2016 रोजी अधिसूचना जारी केली असून या आधिसूचनेची प्रत मच्छिमारी सहकारी संस्थेला देण्यात आलेली आहे. अधिसूचनेतील महत्त्वाच्या तरतूदीनूसार परवानाधारक पर्ससीन नौकांनी सप्टेंबर ते डिंसेबर या काळावधीतच अधिसूचनेत नमूद केलेल्या क्षेत्रात व विहीत जाळयांच्या आकाराचा वापर करुन मासेमारी करता येईल.
अधिसुचनेतील तरतुदीनुसार 01 जानेवारी ते 31 मे पर्यंत पर्ससीन मासेमारीस बंदी करण्यात आलेली आहे. तसेच 1 जून ते 31 जुलै हा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी आहे. या कालावधीत यांत्रिक पध्दतीने मासेमारीस पुर्णत: बंदी करण्यात आलेली आहे. नौका पर्ससीन जाळयाने मासेमारी करताना आढळल्यास मत्स्यविभागामार्फत महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन 1981 व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम (सुधारणा) अध्यादेश, 2021 मधील कलम 17 पोटकलम (5) जो कोणी पर्ससीन किंवा रिंग सिन (लहान पर्ससीन सह) किंवा मोठया आसाचे ट्रॉल जाळे यांच्या विनियमनाशी संबंधित असणाऱ्या आदेशाचे उल्लंघन करील तो- (एक) पहिल्या उल्लंघनासाठी एक लाख रुपये इतक्या शास्तीस (दोन) दुसऱ्या उल्लंघनासाठी तीन लाख रुपये इतक्या शास्तीस; (तीन) तिसऱ्या किंवा त्यानंतरच्या उल्लंघनासाठी सहा लाख रुपये इतक्या शास्तीस, पात्र असेल.