रत्नागिरी: आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झालेल्या जि.प. शाळा देहेण तळवटकरवाडी शाळेचे मुख्याध्यापक रेवाप्पा खोत व सहकारी शिक्षक नकुल कड यांचा समारंभपूर्वक जाहीर सन्मान

0
167

दापोली ( प्रतिनिधी )- दापोली तालुक्यातील देहेण येथील ग्रामस्थ व मुंबई मंडळ देहेण तळवटकरवाडी यांच्या वतीने नुकताच रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झालेल्या जि.प. शाळा देहेण तळवटकरवाडी शाळेचे मुख्याध्यापक रेवाप्पा खोत व सहकारी शिक्षक नकुल कड यांचा समारंभपूर्वक जाहीर सन्मान करण्यात आला.


देहेण तळवटकरवाडी शाळेचे मुख्याध्यापक रेवाप्पा खोत व सहकारी शिक्षक नकुल कड यांनी स्थानिक ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती व शासकीय पर्यवेक्षिय अधिकाऱ्यांच्या मदतीने देहेण तळवटकरवाडी शाळेचा कायापालट केला आहे. ही शाळा सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी समृद्ध असून या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताही अत्युच्च अशीच आहे. या संपूर्ण कार्याची दखल घेऊन रत्नागिरी जिल्हा परिषदेने या वर्षीचा ‘ आदर्श शाळा ‘ पुरस्कार देऊन नुकताच या शाळेचा गौरव केला आहे. आता या सर्व गौरवशाली घटनांची दखल घेत गावातील ग्रामस्थ व मुंबई मंडळाने एका विशेष कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक रेवाप्पा खोत व सहकारी शिक्षक नकुल कड यांचा नुकताच जाहीर सत्कार केला. या विशेष समारंभात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रेश्मा झगडे, देहेणचे सरपंच सुरेंद्र बटावले, जयेश हुमणे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रमेश तळवटकर, मुंबई मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या विशेष सत्काराबद्दल संपूर्ण पंचक्रोशीतून दोघांचेही कौतुक व अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here