रत्नागिरी- तालुक्यातील निवळी येथील दळवी कॅश्यू दुकानाचे छप्पर फोडून चोरट्याने सुमारे २ लाख रुपयांची काजूची २८६ पाकिटे लांबविली. चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून ग्रामीण पोलीस त्याच्या मागावर आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,ही घटना सोमवार २५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते मंगळवार २६ एप्रिल रोजी सकाळी ९.१५ वा. कालावधीत घडली आहे. याबाबत संदेश परशुराम दळवी ( ४९, आरोग्यमंदिर, रत्नागिरी ) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दळवी यांचे निवळी येथे कॅश्यू विक्रीचे दुकान आहे.अज्ञाताने भलतीच शक्कल लढवून दुकानात प्रवेश केला. त्याने दुकानाच्या डाव्या बाजूच्या जांभ्या दगडाच्या भिंतीच्या छप्पराच्या खालील दगड फोडला आणि त्यातून त्याने दुकानात प्रवेश केला. पैशाऐवजी त्याने काजूगरांची १ लाख ९९ हजार ७०० रुपयांची वेगवेगळ्या वजनाची २८६ पाकिटे चोरून नेली.मात्र चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात ३० ते ३५ वर्षांचा चोरटा त्यात चोरी करताना दिसून येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर सूर्य करत आहेत.


