लांजा (प्रतिनिधी)राहूल वर्दे
सहावीतील विद्यार्थीनीवर शाळेच्या मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गवाणे ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गवाणे केंद्र शाळा नंबर एक या ठिकाणी सदरची अल्पवयीन पिडीत विद्यार्थिनी असून ती इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे .या शाळेच्या मुख्याध्यापकाने तिच्यावर अत्याचार केला होता. मात्र संबंधित मुख्याध्यापकाच्या नापास करतील या भीतीमुळे या विद्यार्थीनीने घरच्या मंडळींना याची कल्पना दिली नव्हती.शनिवारी २३ रोजी याबाबत तिच्या पालकांनी आपल्या मुलीला विश्वासात घेऊन तिला विचारले असता तिने आपल्यावर घडलेल्या प्रसंगाची पालकांना माहिती दिली. त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांना ही माहिती दिली. गवाणे ग्रामस्थांना ही गंभीर बाब लक्षात आल्यानंतर शनिवारी रात्री गावच्या मंदिरात गाव बैठक झाली. या बैठकीला गावातील प्रमुख, सर्व गावकरी एकत्र जमले आणि सदरचा प्रकार हा अतिशय निंदनीय असून हा प्रकार करणाऱ्या मुख्याध्यापकांचा निषेध करण्यात आला
सदर घृणास्पद प्रकाराबाबत गावकऱ्यांनी या बैठकीत संताप व्यक्त केला आणि याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे ठरवण्यात आले.यानंतर शनिवारी रात्रीच सर्व गावकरी हे लांजा पोलिस ठाण्यात दाखल झाले. या ठिकाणी ग्रामस्थांनी घडलेला प्रकार पोलिसांना कथन केला आणि संबंधित मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सदरहू प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लांजा पोलिस ठाण्यात या शाळेच्या मुख्याध्यापकांवर भादवि कलम ३५४ तसेच बाल लैंगिक अत्याचार (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे


