प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी– येथील मिऱ्या समुद्र किनारी अडकून पडलेले बसरा स्टार जहाज बाहेर काढण्यासाठी दुबईतील एजन्सीने अनुत्सुकता दाखविली आहे. त्यामुळे हे जहाज अजूनही लाटांचा मारा सहन करत किनाऱ्यावर उभे आहे.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डकडून वारंवार जहाज मालकाशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी (टेक्निशियन), जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी आदींच्या साहाय्याने जहाजावरील जळके ऑईल काढण्यात आले. त्यानंतर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हे जहाज काढणार असल्याचे निश्चित झाले आहे; मात्र त्यातही तांत्रिक अडचणी आल्याने काेट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. खर्चामुळे एजन्सीने जहाज काढण्याबाबत अनुत्सुकता दाखवली. अनेक अडचणी आल्याने गेल्या तीन वर्षांपासून हे जहाज अद्यापही मिऱ्या समुद्र किनाऱ्यावरच पावसासह लाटांचा मारा झेलत उभे आहे. त्याबाबत अजूनही कोणताही तोडगा काढण्यात आले नाही.
केंद्राकडून तांत्रिक मंजुरी नाही
हे जहाज भंगारात काढण्यासाठी गाेव्याच्या एजन्सीशी पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर स्थानिक पातळीवरील काही लाेकांना एकत्र येत याचा ठेका घेण्याचे ठरविले. स्थानिक एजन्सीकडून हे जहाज काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार हाेते. मात्र, केंद्राकडून तांत्रिक मंजुरी न मिळाल्याने ते कामही रखडले.


