गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांकरीता मार्गदर्शक सुचना जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. या मार्गदर्शक सुचनांमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांना कोरोना चाचणीची आवश्यकता नाही असे नमूद करण्यात आले आहे.ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले नाहीत त्यांना 72 तास आधीच्या आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे.अथवा त्यांची जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी करण्यात येईल. चाचणीत ज्या व्यक्ती कोरोनाबाधित सापडतील त्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.
त्याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूका काढू नयेत असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीचा शक्यतो वापर करु नये. गणेशमुर्तीचे विसर्जन घराच्या आवारात करावे.गणेशविसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करुन त्यामध्ये विसर्जन करावे. सार्वजनिक गणेशोत्सव केल्यास गणपती दीड दिवसाचा असावा
गणेशोत्सव काळात आरती, भजन, कीर्तन, जाखडी अशा कार्यक्रमांना गर्दी करू नये. हे कार्यक्रम कौटुंबिक स्तरावर व्हावेत.
नैसर्गिक वस्तूंपासून आकर्षक आरास करत प्लॅस्टीक आणि थर्माकोलचा वापर सजावट आणि आरास करताना टाळावा.
मुर्तीचे विसर्जन घरगुती स्वरुपात करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी देताना श्री गणेशाचा प्रसाद देणे टाळावे. सुका मेवा,फळे यांचा प्रसाद द्यावा. मिठाईतील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीकडून गणेश मुर्ती संकलन वाहनाची व्यवस्था करण्यात यावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे