प्रतिनिधी: राहुल वर्दे
रत्नागिरी- युध्दभूमीवर, अतिरेक्यांच्या भ्याड कारवायांमध्ये, मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती देणाऱ्या योध्यांच्या बलिदानाची आपण कोणत्याही स्वरुपात परतफेड करु शकत नाही. ध्वजदिन निधीचा उपयोग शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या अडी-अडचणी दूर करण्यासाठी केला जातो. चालू वर्षाचे निधी संकलनाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्व विभागाने 100 टक्के पूर्ण करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत सभागृह येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2021 संकलन शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक मोहितकुमार गर्ग, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नंदिनी घाणेकर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुशांत खांडेकर, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, देशातील सैनिक सीमेवर लढत असतात तसेच देशातंर्गत आपत्तीच्या प्रसंगामध्येही मोलाची मदत करतात. याठिकाणी सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वांचे सरंक्षण करत असतात. देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी हजारो शूर विरांनी प्राणांची आहुती दिली आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन 7 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने निधी संकलनास हातभार लावून सर्वांनी सैनिकांप्रती आदर व्यक्त करावा.जिल्हा पोलीस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांनी सांगितले, देशाच्या उन्नतीमध्ये सैन्याचा मोठा वाटा आहे. सैनिकांना व त्यांच्या कुटूंबियांना आपण नेहमी मदत केली पाहिजे असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी निधी संकलनाबाबत माहिती दिली. 7 डिसेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ध्वजदिन निधी संकलित केला जातो. विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो असे त्यांनी सांगितले.
यावेळी शौर्य पदक धारक, युध्द विधवा, वीरमाता-पिता आणि वीरपत्नी यांचा तसेच विशेष गौरव पुरस्कारांतर्गत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळविल्याबद्दल सैनिक पाल्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांना ध्वज प्रदान करुन ध्वजदिन निधी 2021 चा शुभांरभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
दैनिक सिंधुदुर्ग समाचार
*


