प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी- रत्नागिरी किनार्यापासून सुमारे 41 मैल पश्चिमेला बुडत असलेल्या जहाजातील 19 जणांना वाचवण्यात भारतीय तटरक्षक दलाला मोठे यश मिळाले आहे. भारतीय तटरक्षक दलाने 18 भारतीय आणि 01 इथिओपियन मास्टरसह 19 जणांना मोटार टँकर जहाजातून यशस्वीरित्या वाचवले आहे
रत्नागिरी किनार्यापासून सुमारे 41 मैल पश्चिमेला सकाळी 9 वाजून 23 मिनिटाला जहाज बुडत असल्याची माहिती मिळाली. हे जहाज यूएईच्या खोर फक्कन येथून न्यू मंगलोरला जात होते. जहाजातून मदतीचा कॉल आला. त्यानंतर ICGS सुजीत आणि ICGS अपूर्व या परिसरात आणि परिसरात गस्त घालणारी दोन तटरक्षक जहाजे अपघातग्रस्त जहाजाकडे वळवण्यात आली.
अॅस्फाल्ट बिटुमेन 3911 एमटी वाहून नेणाऱ्या जहाज सकाळी नऊच्या दरम्यान अचानक बुडत असल्याचे जहाजावरील क्रू मेंबर्सला निदर्शनास आले. जहाज पूर्ण बुडण्याची शक्यता असल्याचे पाहून क्रू ने जहाज सोडून दिले. त्याचवेळी तटरक्षक दलाकडून योग्य पद्धतीने बचाव कार्य करून या जहाजावरील 19 जणांची सुखरुप सुटका केली आहे. संकटाच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची धीरगंभीरता, तत्परता आणि व्यावसायिकता यामुळे आतापर्यंत 11 हजाराहून अधिक लोकांचे प्राण वाचले आहेत.


