रत्नागिरी : राजापूरच्या निवासी नायब तहसीलदारांना लाच घेताना अटक

0
44

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

राजापूर- दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना राजापूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी व सध्या निवासी नायब तहसीलदार पदाचा कार्यभार असणाऱ्या अशोक गजानन शेळके (वय ५८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली आहे.

रत्नागिरी जिल्हा लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, यातील तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे राजापूर तहसील कार्यालयात ७० ब अंतर्गत दावा सुरू होता. या दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी अशोक शेळके यांनी १० ते १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम १० हजार रुपये ठरली.

याबाबतची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाला दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची शहानिशा करत बुधवार, दि. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी सापळा रचला. यामध्ये अशोक गजानन शेळके यांना १० हजार रुपयांच्या लाचेसह रंगेहाथ पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले. या प्रकरणी शेळके यांना ताब्यात घेण्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

काही वर्षांपूर्वी राजापूर तहसीलदार हुन्नरे यांच्यावर चिरेखाणीच्या एका प्रकरणात मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली होती. त्यानंतर राजापूर तहसीलदार कार्यालयात झालेली ही दुसरी कारवाई आहे. हा सापळा पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उप-अधीक्षक, सुशांत चव्हाण, लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण ताटे, सहायक फौजदार संदीप ओगले, हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, पोलीस शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर यांनी ठाणे परिक्षेत्राचे अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here