रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात

0
40
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात

नवी दिल्ली- रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. या दोन देशांमधील वादाचा जगावर मोठा परिणाम पडत आहे. भारतीयांनाही या युद्धाचा मोठा झटका लागू शकतो. रशिया-युक्रेन तणावामुळे गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती. गुरुवारी रशियाने युक्रेनवर हल्ला करताच कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०३ डॉलरवर पोहोचल्या. गेल्या अडीच महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमती २७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

कच्चा तेलाच्या किमती वाढल्या, पण गेल्या अडीच महिन्यांत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलीही वाढ केलेली नाही. सध्या पाच राज्यात निवडणुका असल्यामुळे वाढ होत नाहीये, पण उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका संपताच इंधनाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०३ डॉलरवर पोहोचली आहे. यापूर्वी २०१४ मध्ये कच्च्या तेलाची किंमत $१०० च्या वर गेली होती. ३ नोव्हेंबरपासून देशांतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पण तेव्हापासून कच्चे तेल प्रति बॅरल $२० पेक्षा महाग झाले आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळ चालले तर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $१२० पर्यंत जाऊ शकते.अशा परिस्थितीत देशांतर्गत तेल कंपन्या डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रति लिटर १५ रुपयांनी वाढवू शकतात. ही वाढ एकाच वेळी न करता दोन-तीन टप्प्यांत केली जाण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायूच्या किमतीही वाढत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत एलपीजी आणि सीएनजीच्या दरातही १० ते १५ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश आणि पंजाबसह ५ राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर तेल कंपन्या दर वाढवतील, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. १० मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. निवडणुकीच्या काळात तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर वाढवत नाहीत, असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. भाव वाढल्याने सरकारचला राजकीय नुकसान सहन करावे लागू शकते. पण, निवडणुकीचा निकाल लागताच इंधनाच्या किमतीत वाढ होऊ शकते.

केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. यानंतर अनेक राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करही कमी केला, त्यामुळे दर कमी झाले. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. तेव्हापासून कच्च्या तेलात लक्षणीय वाढ झाली आहे. ३ नोव्हेंबर २०२१ रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $८० होती, जी आता प्रति बॅरल $१०३ च्या वर पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here