मुंबई- राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा मुंबईत होणार आहे, हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत झाल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनात नागपूरला घेण्याची घोषणा सरकारने केली होती. पण विधिमंडळ समितीने अधिवेशन मुंबईतच घ्यावे अशी शिफारस सरकारला केली आहे, अशी माहिती मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
राज्य सरकारचा मानस होता की राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये घेतलं पाहिजे, पण विधीमंडळ सचिवालयाने जी माहिती पाठवलेली आहे, त्यानुसार राज्यपालांच्या अभिभाषणासाठी नागपूरमध्ये संयुक्त सभागृह उपलब्ध नाही. तिथलं आमदार निवास हे क्वारंटाईन सेंटरसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे तिथे अधिवेशन घेणं शक्य होणार नाही.
त्या शिफारसींनुसार राज्यपालांना हे कळवण्यात येईल, आणि नंतर पंधरा तारखेला कामकाज सल्लागार समितीसमोर हा विषय मांडून यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल,अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली


