महाराष्ट्रात जुलै महिन्यातील अतिवृष्टीने रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्हा पूरग्रस्त भाग म्हणून जाहीर झाला होता.अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील व्यावसायिकांचे खूप नुकसान झालं आहे. या भागातील बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने पात्र बाधितांना 50 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. परंतु या बाधितांना त्यांचे व्यवसाय पुन्हा उभे करण्यासाठी अल्प दरात 5 ते 6 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. पूरग्रस्तांना पुन्हा व्यवसाय करता यावा यासाठी स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
या बैठकीला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, सहकार विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.