मुबंई- राज्यात एकूणच मानसिक रुग्णांची संख्या वाढत असून करोना काळात बेरोजगारी तसेच आजारपणातून मानसिक आधाराची गरज असलेले रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तब्बल १५०० कोटी रुपये खर्चून सध्या अस्तित्वात असलेल्या चारही प्रादेशिक मनोरुग्णालयांचे नवनिर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चारही मनोरुग्णालये १०० वर्षांपूर्वीची असून नव्याने या रुग्णालयांची उभारणी केली जाणार आहे.
राज्यात पुणे, ठाणे, नागपूर व रत्नागिरी अशा चार ठिकाणी आरोग्य विभागाची मनोरुग्णालये असून आरोग्य विभागाच्या विविध संस्थांच्या विकासासाठी ‘आशियायी विकास बँके’कडून ५१७७ कोटी रुपये कर्ज घेण्यात आले आहे तर राज्य सरकारने आपल्या हिश्याचे २२९० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही मानसिक आजारावरील उपचारांच्या विकासासाठी आग्रही असून २१ जून २०२१ रोजी ‘ ग्रामीण आरोग्य पायाभूत सुविधां’च्या बैठकीत प्रत्येक महसुली विभागात एक मनोरुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याचाच एक भाग म्हणून नुकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत जालना येथे १०० कोटी रुपये खर्चून मनोरुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. १०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या चारही मनोरुग्णालयांचा युद्धपातळीवर विकास केला जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.