मुंबई, दि. ५ : राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे. या निवडणुका २ डिसेंबर रोजी पार पडणार असून मतमोजणी ३ डिसेंबरला केली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.https://sindhudurgsamachar.in/एसटी-महामंडळ-राज्यभरात-इ/
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून १७ नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल. १८ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होईल, तर २१ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी असेल. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती वाघमारे यांनी दिली.
या निवडणुकीत एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. मतदार ६ हजार ८५९ सदस्य आणि २८८ नगराध्यक्षांची निवड करणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे, असे आयोगाने स्पष्ट केले. या निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारेच घेण्यात येणार असल्याचे दिनेश वाघमारे यांनी सांगितले. तसेच, मतदार याद्यांमधील दुबार नावे शोधण्यासाठी एक विशेष टूल विकसित करण्यात आले असून आयोगाने याबाबत पूर्ण दक्षता घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
दुबार नाव असलेल्या मतदारांशी संपर्क साधल्यावर प्रतिसाद न मिळाल्यास अशा मतदाराच्या नावासमोर सर्व मतदान केंद्रांवर ‘डबल स्टार’ चिन्ह दर्शवले जाईल. तसेच, अशा मतदारांकडून त्यांनी दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करणार नाहीत, याबाबत लिखित हमीपत्र घेतले जाईल, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.


