राज्यातील शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाणार MahaStudent ॲपद्वारे!

0
108

सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. MahaStudent ॲपद्वारे ही माहिती नोंदवावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती तात्काळ कळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डिजिटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे. भारत सरकारने ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ हा निर्देशांक विकसित केला असून यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजिटल पद्धतीने उपस्थिती यासाठी गुण देण्यात येणार आहेत. यादृष्टीने राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणालीमध्ये ही उपस्थिती नोंदविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून यामध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच अनुपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. या ॲपमुळे विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक वेगळ्याने ठेवण्याची तसेच मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही, असे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here