धुळे, निफाड, जळगाव, जेऊर आणि परभणी येथे तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली गेल्याने थंडीची लाट आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह राज्यात आल्यामुळे थंडीचा कडाका वाढला. राज्यातील बहुतांशी भागात मागील ३ दिवसांमध्ये किमान तापमानात मोठी घट झाली आहे.
धुळे येथे राज्यातील सर्वात कमी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर रत्नागिरी येथे सर्वाधिक ३३.५ अंश तापमान नोंदले गेले. जेऊर येथे ९ अंश सेल्सिअस, निफाड आणि जळगाव येथे ९.५ अंश सेल्सिअस आणि परभणी येथे १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
राज्यातील सर्वच भागात किमान तापमानात २ ते ४ अंशांपर्यंत तापमान कमी झाले आहे. राज्यात सकाळी चांगलीच थंडी जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण अधिक आहे. सकाळी गारठा वाढला तरी दुपारी मात्र बहुतांशी भागात उन्हाचा चटका कायम आहे. बहुतांशी भागात दुपारचे कमाल तापमान ३० अंशाच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी यापेक्षाही अधिक तापमान आहे. राज्यातील किमान तापमानातील घट कायम राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.


