रानपक्ष्याला छोट्या मुलांनी दिले जीवदान!

0
182

दापोली- रानातील पशुपक्ष्यांकडे पाहण्याचा आताच्या मानवी पिढीचा दृष्टिकोन बदलला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यात पशु पक्ष्यांचे योगदान किती महत्वाचे आहे हे आजच्या पिढीला कळून चुकले आहे. पुर्वी दगड आणि बेचकी घेऊन पक्ष्यांना टिपण्यासाठी त्यांच्या मागे धावणारी, पाठलाग करणारी मुले आज अशा पक्ष्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावतात तेव्हा त्यांचे कौतुक करावे तितके कमीच असते.

दाणागोटा आणि भक्ष्य शोधताना असाच एक पाणकावळा जातीचा रानपक्षी अनावधानाने शेतीसंरक्षक जाळ्यात अडकला आणि जीवाच्या आकांताने जाळ्यातून सुटण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र त्याचा फडफडाट तेथे जवळच क्रिकेट खेळणाऱ्या छोट्या मुलांच्या कानांवर पडला आणि या मुलांनी पुढे सरसावत त्या रानपक्ष्याला जीवदान दिले.
दापोली तालुक्यातील कोंगळे या आंजर्ले खाडीपट्ट्यातल्या गावातील मुलांनी रानपक्ष्याला जीवदान देण्याची ही फार मोठी कामगिरी केली आहे. संध्याकाळच्या वेळेस कोंगळे गावात राहणारी सुशील साळवी, समीर साळवी, आयुष साळवी, पारस रेवाळे, वेदांत साळवी, अक्षय साळवी, साहील साळवी ही मुले खाडीजवळील शेतात क्रिकेट खेळत असताना जवळच भाजीपाला शेतीच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात एक रानपक्षी अडकून जीव वाचविण्यासाठी फडफडाट व कलकलाट करताना या मुलांनी पाहिले. शाळेतली परीक्षा संपल्याने ही मुले दररोज येथील हिरव्यागार खलाटीत क्रिकेट खेळतात. या रानपक्ष्याला वाचविण्यासाठी खेळ अर्ध्यावर सोडून ही मुले धावत त्या पक्ष्याकडे गेली. जीव वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या या रानपक्ष्याला वाचवायलाच हवे असे मनाशी पक्के ठरवून या मुलांनी अथक प्रयत्न करून पाणकावळा जातीच्या त्या रानपक्ष्याला वाचविले. जाळ्यात अडकलेले त्याचे पाय व पंख अलगद सोडवून या मुलांनी त्या पक्ष्यास जीवदान दिले व पाणी पाजून नैसर्गिक अधिवासात सोडले.

सध्या अनेक रानपक्ष्यांच्या प्रजाती दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालल्या आहेत. पर्यावरण संतुलन राखण्याच्या कार्यात पक्ष्यांचे योगदान फार मोठे आहे. पाणकावळा ही एक अशीच दुर्मिळ होत चाललेली पक्षी प्रजाती आहे. मात्र छोट्या मुलांनी या पक्ष्यांचे पर्यावरणासाठीचे महत्त्व ओळखून संकटात सापडलेल्या रानपक्ष्यास जीवदान दिल्याने ऊनेक पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमींनी या छोट्या मुलांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here