रामानंद सागर यांच्या गाजलेल्या ‘रामायण’ या पौराणिक मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले आहे. अरविंद त्रिवेदी 82 वर्षांचे होते. अरविंद त्रिवेदी ब-याच काळापासून आजारी होते. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.
1986 मध्ये दूरदर्शनवर सुरू झालेल्या या मालिकेतील रावणच्या भूमिकेने अरविंद त्रिवेदी यांना लोकप्रियता मिळवून दिली होती.रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत त्यांनी साकारलेला रावण आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. रामायणातील केवटच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. रामानंद सागर यांनी त्यांची ऑडिशन घेतली होती. ऑडिशन घेताना त्यांना समजले की, रावणच्या भूमिकेसाठी अरविंद अधिक परफेक्ट आहेत. रामानंद सागर अरविंद यांच्या बॉडी लँग्वेजने खूप प्रभावित झाले होते आणि म्हणून त्यांनी रावणाच्या भूमिकेसाठी त्यांची निवड केली होती. रामानंद सागर यांनी रावणाच्या भूमिकेसाठी तब्बल 300 जणांची ऑडिशन घेतली होती.
रामायण या पौराणिक मालिकेत प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी अरविंद त्रिवेदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.वैयक्तिक जीवनात माझे अरविंद त्रिवेदी यांच्याशी खूप चांगले संबंध होते. आम्ही खूप चांगले मित्र होतो. आम्हाला एकमेकांबद्दल खूप आदर होता. जेव्हाही ते मला बघायचा, तेव्हा हात जोडून मला प्रभू म्हणून हाक मारायचे. मी त्यांना नेहमी अरविंद भाई म्हणत असे.त्यांच्याबरोबरच्या अनेक आठवणी आहेत. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो,’ अशा शब्दांत अरुण गोविल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.