रुग्णसेवा देणाऱ्यांच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी घ्या – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

0
137

मुंबई, दि. 31 : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 82 शिकाऊ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटनेची वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून या संदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करावा अशा सूचना महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना श्री.देशमुख यांनी दिल्या आहेत.

वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल तसेच अन्य कर्मचारी वैद्यकीय सेवा पुरवितात. कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होण्यासाठी कोणत्या बाबी कारणीभूत आहेत याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विचारणा केली. वैद्यकीय सेवा देताना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कार्यरत असणारे मनुष्यबळ बाधित होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ही घटना लक्षात घेता राज्यातील अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनीही याबाबतचे नियम काटेकोरपणे पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले मनुष्यबळ बाधित होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सर्व महाविद्यालयांना सतर्क करण्यात यावे याबाबतच्या सूचनाही त्यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिल्या आहेत.

याबाबतचा अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल असे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here