रेल्वेतील चोऱ्यांना आळा ; नेरूळ गुन्हे शाखेचे मोठे यश; ८ गुन्ह्यांचा पर्दाफाश, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
17
रेल्वेतील चोऱ्यांना आळा ; नेरूळ गुन्हे शाखेचे मोठे यश; ८ गुन्ह्यांचा पर्दाफाश, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
रेल्वेतील चोऱ्यांना आळा ; नेरूळ गुन्हे शाखेचे मोठे यश; ८ गुन्ह्यांचा पर्दाफाश, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

रेल्वेतील चोऱ्यांना आळा ; नेरूळ गुन्हे शाखेचे मोठे यश; ८ गुन्ह्यांचा पर्दाफाश, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी l

कोकण रेल्वेमार्गावर सापे वामने ते दिवाणखवटी दरम्यान प्रवाशांच्या गळ्यातील दागिने, पर्स आणि मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रेल्वे गुन्हे शाखा नेरूळ युनिट ५ ने मोठे यश मिळवले आहे. सापे-वामने ते दिवाणखवटी रेल्वे स्टेशनदरम्यान प्रवाशांच्या सोन्या-दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा छडा लावत त्यातील एक महत्त्वाचा आरोपी विनोद सखाराम जाधव (रा. जामखेड, अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून तब्बल ५ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून रत्नागिरी विभागातील एकूण आठ चोऱ्या उघडकीस आल्या आहेत.

हे पण वाचा अतितीव्र दिव्यांगांसाठी ‘निर्वाह भत्ता योजना’

ही माहिती लोहमार्ग पोलिसांच्या हार्बर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा कुलकर्णी यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी व पोलीस उपनिरीक्षक सुनील लोणकर उपस्थित होते.

चोरटे ‘खांद्यावर खांदा’ तंत्राने करत होते चोरी

तपासादरम्यान उघडकीस आलेली पद्धत पोलीस दलालाही चकित करणारी ठरली. ऑऊटर सिग्नलजवळ रेल्वे थांबली की दोन चोरटे झुडुपात दबा धरून बसायचे. एका चोरट्याने दुसऱ्याच्या खांद्यावर उभे राहून थेट खिडकीतून हात घालायचा आणि प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, तसेच खिडकीच्या हुकाला लटकवलेल्या पर्स सहज उचलायच्या. ही टोळी सीसीटीव्हीपासून दूर राहण्यासाठी विशिष्ट ‘सुरक्षित मार्ग’ वापरत असे.

चोरटे स्वतःची डिझायर कार स्टेशनपासून दूर झाडीझुडपांत लपवून ठेवत. ॲपवरून कोणती गाडी रात्री कुठे थांबते याची माहिती घेऊन त्यानुसार चोरीचे नियोजन करत. ही टोळी अत्यंत शिताफीने चोरी करून पळून जात असल्याने महिनोंमहिने त्यांचा माग काढणे अवघड झाले होते.

अटक कारवाई : तीन दिवस सापळा रचला

जामखेड, अहिल्यानगर येथील संशयित चोरट्यांबाबत ठोस माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा, नेरूळ युनिट–५चे पथक जामखेड येथे रवाना झाले. सलग तीन दिवस सापळा रचून अखेर ३० नोव्हेंबर रोजी विनोद सखाराम जाधव याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ५ लाख २ हजार किमतीचे ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या. त्याला न्यायालयाने १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटक आरोपीने दिलेल्या माहितीनुसार या टोळीत आणखी तीन चोरटे सामील असल्याचे समोर आले —

  • मारुती राजेंद्र झरे (रा. आष्टी, बीड)
  • सोनू सुरेश काळे (रा. जामखेड)
  • लाला मच्छिंद्र पवार (रा. जामखेड)

ही टोळी आणखी मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंतच्या आठ चोऱ्यांचा उलगडा

कोकण रेल्वेमार्गावर या काळात घडलेल्या आठ चोऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. गुन्हे शाखा आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्त तपास करीत या सर्व चोऱ्यांचा छडा लावला आहे. या यशस्वी कारवाईमुळे कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रवाशांनी सावध राहण्याचे आवाहन

रात्रीच्या वेळी रेल्वे डब्यांच्या खिडक्या बंद ठेवणे, मौल्यवान वस्तू बाहेर दिसणार नाहीत अशा काळजीपूर्वक ठेवणे आणि रेल्वे उभी असताना विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा कुलकर्णी यांनी केले. तातडीने मदत हवी असल्यास हेल्पलाइनचा वापर करावा असेही त्यांनी सांगितले.

नेरूळ गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे रत्नागिरी विभागात गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा धक्का बसला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here