मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला जाणाऱ्या तसेच कसारा, इगतपूरी येथे अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने आज पहाटे ४ वाजता तातडीने १३३ बसेस सोडल्या. या बसेसमधून सुमारे ५ हजार ८०० प्रवाशांना इच्छितस्थळी सुखरूप सोडण्यात आले, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.
परिवहन मंत्री ॲड. परब म्हणाले,मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने हजारो प्रवासी वेगवेगळ्या ठिकाणी अडकले होते. याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांच्या सेवेकरिता एसटी महामंडळाने ठाणे (९३) व नाशिक (४०) विभागातून सुमारे १३३ बसेस उपलब्ध करून देवून पहाटे ४ वाजल्यापासून बस सेवा सुरु करण्यात आली. मुसळधार पाऊस पडत असतानाही एसटी महामंडळाने तातडीने बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे सुमारे ५ हजार ८०० हून अधिक प्रवाशांना इच्छितस्थळी सुखरूप सोडण्यात आले.
पुणे-मुंबई मार्गावर ७४ जादा गाड्या सोडल्या
पावसामुळे पुणे-मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्याकरिता एसटी महामंडळाने पुणे स्थानक येथून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी ६५ जादा बस सोडल्या. तर मुंबईहून ९ बसेस सोडण्यात आल्या, अशी माहिती श्री. परब यांनी दिली.