वाडगाव (जि. रायगड) येथे रसानी टेकडीवरील दत्त मंदिर यात्रास्थळाच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी हनुमान मंदिर परिसरातील पेव्हर ब्लॉक बांधकामासाठी वळवण्यात आल्याचा आणि प्रत्यक्षात कोणतेही काम न झाल्याचा आरोप दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, सदस्य आणि ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची लेखी तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे करण्यात आली आहे.
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या कोट्यातून रसानी टेकडीवरील श्रीदत्त मंदिरासाठी आरओ प्लांट बसवून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, कार्याचे नाव बदलून हा निधी वाडगाव येथील हनुमान मंदिर परिसरात भाविकांच्या वाहनांसाठी पेव्हर ब्लॉक घालण्याकरिता वर्ग करण्यात आला. हे काम कर्जत येथील ठेकेदार शुभम शिर्के यांच्या नावे मंजूर करण्यात आले असून, त्यांना दहा लाख पन्नास हजार रुपये देण्यात आल्याचे म्हटले जाते.
तथापि, ना दत्त मंदिर परिसरात ना हनुमान मंदिर परिसरात कोणतेही बांधकाम झालेले दिसत आहे. त्यामुळे लाखो रुपयांच्या निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, संबंधित कामांची चौकशी करून तातडीने स्थळ पंचनामा करावा आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


