पुणे, पालघर, नंदुरबार, कोल्हापूर यांनी कुमार तर मुंबई उपनगर, नांदेड, ठाणे, पुणे यांनी कुमारी गटात निमंत्रित जिल्हा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. पालघर विरुद्ध कोल्हापूर, पुणे विरुद्ध नंदुरबार अशा कुमार, तर ठाणे विरुद्ध पुणे, मुंबई उपनगर विरुद्ध नांदेड अशा कुमारी गटात लढती होतील. वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ-औरंगाबाद संचलित वसंतराव नाईक महाविद्यालयांच्या “सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरील मॅटवर खेळविण्यात आलेल्या कुमारांच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याने अहमदनगरचा ५४-३० असा सहज पाडाव केला. विश्रांतीला ३०-१९ अशी आघाडी घेणाऱ्या पुण्याने विश्रांतीनंतर देखील आपला जोश कायम राखत हा विजय सोपा केला. पृथ्वीराज शिंदे, कृष्णा शिंदे, ओंकार काळभोर यांचा चतुरस्त्र खेळ या विजयात महत्वपूर्ण ठरला. शुभम पठारे, संकेत खलाके यांचा खेळ नगरचा पराभव टाळण्यास कमी पडला.
पालघरने पूर्वार्धातील १४-१९ अशी ५गुणांची पिछाडी भरून काढत रत्नागिरीला ४१-२७ असे नमवित कुमार गटात उपांत्य फेरीत धडक दिली. प्रतीक जाधव, विशाल भोसले यांच्या उत्तरार्धातील झंजावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. श्रेयस शिंदे, वेद पाटील यांच्या उत्कृष्ट खेळणे पूर्वार्धात रत्नागिरीला आघाडी मिळवून दिली होती. पण उत्तरार्धात ती त्यांना टिकविता आली नाही. नंदूरबारने मुंबई उपनगरला ३९-३२ असे चकवीत आपली विजयी घोडदौड कायम राखली. पहिल्या डावात १८-१२ अशी आघाडी घेणाऱ्या नंदुरबारने दुसऱ्या डावात सावध खेळ करीत हा विजय साकारला. ओमकार गाडे, तेजस काळभोर, प्रणव धुमाळ, सुशांत शिंदे नंदुरबारकडून, तर आकाश रुडले, रजत सिंग, यश डोंगरे उपनगरकडून उत्कृष्ट खेळले. शेवटच्या सामन्यात कोल्हापूरने बीडचा ५३-१७ असा धुव्वा उडवीत आरामात उपांत्य फेरी गाठली. सुरुवाती पासून शेवटपर्यंत आक्रमक खेळ करीत कोल्हापूरने हा एकतर्फी विजय मिळविला. आदित्य चौगुलेचा अष्टपैलू खेळ त्याला तेजस पाटीलची मिळालेली चढाईची, तर दादासाहेब पुजारीची मिळालेली पकडीची महत्वपूर्ण साथ यामुळे हे शक्य झाले.
कुमारी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई उपनगरने यंदाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या पालघरचा ४७-२९ असा पराभव केला. आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धातच २५-१० अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात संयमाने खेळ करीत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. याशिका पुजारी, हरप्रित संधू, सानिका पाटील यांच्या चढाई-पकडीचा खेळ या विजयात महत्वपूर्ण ठरला. पालघरची हर्षा शेट्टी एकाकी लढली. नांदेडने औरंगाबादला ३७-२६ असे नमविले. सानिका पाटील प्राची लोहार, सायली पाटील यांच्या चढाई-पकडीच्या उत्तम खेळाने ही किमया साधली. औरंगाबादच्या तृप्ती अंधारे हिने एकाकी लढत दिली. पुण्याने सांगलीला ४०-३८ असे चकवीत उपांत्य फेरी गाठली.