प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 74 वर्षे पूर्ण केली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्यांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
सोशल मीडियावर अकाउंटवर दोघांचा एक फोटो शेअर करत निवेदिता म्हणतात, ‘प्रिय अशोक वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी माझ्या मागील आयुष्यात काहीतरी चांगले केले असावे, म्हणूनच तू मला माझा नवरा म्हणून लाभला. तू माझे सामर्थ्य, माझा गुरु, माझा जिवलग मित्र, माझे पालक माझा सर्वकाही आहेस. तू एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासोबतच एक चांगला माणूस आहेस,’ अशा शब्दांत निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दण यांसारख्या सिनेमातून धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन’ व ‘एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर’पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले.