वैद्यकीय महाविद्यालये- रुग्णालयांनी सेवांचा विस्तार करण्याची आवश्यकता – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

0
101

मुंबई, दि. १२ – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांनी त्यांच्या सेवांचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे. रुग्णशय्या, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स या साधनसामुग्रीची संख्या वाढविण्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी शासनस्तरावरून सर्व आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज दिली.कोरोना 19 विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट पाहता वैद्यकीय महाविद्यालयाची जी रुग्णालये पूर्णपणे रुग्णांनी व्यापली गेली असतील त्या ठिकाणी संलग्न अशी कोविड केअर सेंटर्स सुरू करण्याची आवश्यकता आहे.

रुग्ण व्यवस्थापन करणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न व्हावेत. सौम्य आणि कमी लक्षणे असतील अशा रुग्णांवर उपचारासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिल्या.सध्या ऑक्सिजनचे 100 टक्के उत्पादन हे फक्त वैद्यकीय कारणासाठीच आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने वाहतूकीचे योग्य नियोजन केल्यास ऑक्सिजन पुरवठ्यात सुलभता निर्माण होणार आहे, त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी दिल्या.

व्हेंटिलेटरची वाढती मागणी लक्षात घेता केंद्राकडे राज्य शासन मागणी करीत आहे, व्हेंटिलेटरची कमतरता भरून काढण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.आयुष संचालनालयाच्या शासकीय व अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयांनी कोविडच्या या लढ्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहे. या महाविद्यालयांचा उपयोग जिल्हा प्रशासनाने करून घेण्यासाठी तेथील सुविधांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिल्या.राज्यात रेमडेसेवीरचा मोठ्या संख्येने पुरवठा सुरू होईल, भारताबाहेर निर्यातबंदी असल्याने त्याचा निश्चितच फायदा होईल, मात्र रेमडेसिवीरचा वापर करताना भारतीय वैद्यकीय संसोधन परिषद (आयसीएमआर) च्या प्रोटोकॉलच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी दिले.

रेमडेसिवीर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स आदी अत्यावश्यक साधन सामुग्रीच्या माहितीसाठी राज्याचा एक स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात यावा, जेणेकरून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना संपूर्ण माहिती या डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळेल आणि त्यानुसार नियोजन करण्यात सुलभता निर्माण होणार आहे, त्यादृष्टीने डॅशबोर्ड तयार करण्याची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचनाही श्री. देशमुख यांनी यावेळी दिल्या.ज्या जिल्ह्यांमध्ये तंत्रज्ञ, एमबीबीएस डॉक्टर्स किंवा इतर मनुष्यबळ बाह्यस्त्रोतांद्वारे भरण्याची मागणी होत आहे, त्या सर्व जिल्ह्यांना शासनस्तरावरून स्वयंस्पष्ट सूचना द्या, काही अडचणी उद्भवल्यास अधिष्ठात्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कार्यवाही करण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here