शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर आज आसले ता. वाई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.आज सकाळी शहिद जवान सोमनाथ मांढरे यांचे पार्थिव लडाख हुन दिल्ली पुणे मार्गे त्यांच्या आसले ( ता वाई) गावी आणण्यात आले. त्यांच्या घरी पार्थिव पोहोचताच सोमनाथ यांच्या नातेवाईकांना शोक अनावर झाला.त्यांची पत्नी,मुले,भाऊ,भावजय आणि मामांनी त्यांच्या आठवणीने दुःखाने सदगदीत झाले. यानंतर सजवलेल्या लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. मार्गामार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता.’अमर रहे अमर रहे सोमनाथ मांढरे अमर रहे, भारत माता की जय,’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहचली. पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली.
लडाख येथे सेवा बजावत असताना शनिवारी पहाटे हवामानात झालेल्या बदलामुळे हवेतील ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने सोमनाथ यांना श्वासोसास घेण्यास त्रास होऊ लागला.त्यातच ते बेशुद्ध पडले.त्यांना तात्काळ लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचे निधन झाले.शनिवारी सायंकाळी ही माहिती त्यांचे नातेवाईक आणि प्रशासनाला कळविण्यात आली.आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, माजी आमदार मदन भोसले, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, वाई पंचायत समितीच्या सभापती संगिता चव्हाण यांनी शहिद जवान सोमनाथ मांढरे यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.


