महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला एक महत्वाचं पत्र लिहिलं आहे. यात विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून फक्त शिक्षक असलेलाच व्यक्ती उमेदवार असाव, अशी शिफारस करण्यात आली आहे. अकोल्यातील विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ञ सदस्य प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केला होता. यासाठी त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. डॉ. खडक्कार यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य निवडणूक आयोगाने या बदलाची शिफारस नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. ही शिफारस मान्य झाल्यास शिक्षक मतदारसंघातील संस्थाचालक आणि राजकारण्यांच्या घुसखोरीला चाप बसू शकणार आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत प्रत्येक विभागातील शिक्षक मतदारसंघातून सात आमदार निवडून जातात.


