महाविकास आघाडी सरकारला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत मोठा राजकीय भूकंप केला. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाल्याने राजकीय वातावरण तापले असतानाच आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील रामनगर साखर कारखान्याची 200 एकर जमीन ईडीने जप्त केली आहे
शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या या साखर कारखान्याची 200 एकर जमीन आणि यंत्रसामग्री जप्त केली आहे. साखर कारखान्याच्या जमीनीबरोबरच कारखान्याची इमारत, प्लांट आणि कारखान्याची यंत्रसामग्री ईडीने जप्त केली आहे.ईडीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात पीएमएलए अंतर्गत ही कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी याच कारखान्यावर छापा टाकला होता. यानंतर आता ईडीने या कारखान्याच्या जमीन जप्तीची कारवाई केली आहे.
या कारखान्याच्या विक्रीचा व्यवहार चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांच्यावर करण्यात आला आहे.गेल्या दोन महिन्यांपूर्वी ईडीने या साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश दिले होते. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश देण्यात आले होते. या कारखान्याचा वापर विक्री आणि व्यवहार करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. अखेर आज ईडीने या साखर कारखान्यावर कारवाई करत 200 एकर जमीन जप्त केली आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात आतापर्यंत शिवसेना आणि अपक्षाच्या 42 आमदारांना सामील करून घेतले आहे.राज्यात सध्या तरी शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेने विधिमंडळ गटनेतेपदी अजय चौधरी यांना मान्यता मिळाली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरपळ यांच्या आदेशानुसार अजय चौधरी यांच्या नावाची नोंद यादीत करण्यात आली आहे. त्यामुळे 12 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या शिवसेनेच्या मागणीवर लवकरच सुमावणी होण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांना मान्यता मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटाला धोका निर्माण झाला आहे. फुटलेल्या 12 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत शिवसेनेने मागणी केली आहे. त्यानुसार आज सुनावणी होणार आहे. अपात्र आमदारांना नोटिस बजावण्यात येणार आहे. एके दिवशी 4 आमदारांची सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे 12 बंडखोर आमदार अपात्र ठरणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित न राहिलेल्या आमदारांवर ही कारवाई करण्यात येणार आहे.
संबंधित आमदारांना नोटिस बजावल्यानंतर त्या आमदारांचे नेमकं काय करायचं याबाबत विधानसभा उपाध्यक्ष याबाबत निर्णय घेतील. कोरोनानंतरदेखील आमदारांना ऑनलाईन सुनावणी घेण्याबाबत देखील निर्णय घेण्यात येईल. आमदार ऑनलाईन उपस्थित राहू इच्छित असतील तर त्यासाठी नॅशनल इनफॉरमेटिक सेंटरकडून देण्यात आलेल्या बँडविडथचा वापर करावा लागणार आहे.पण सध्या बँडविडथची उपलब्धता पाहाता एका दिवशी केवळ 4 आमदारांची सुनावणी होऊ शकते. आमदारांचे नेमके काय म्हणणे आहे, हे देखील जाणून घेण्यात येईल. ही अर्धन्यायिक प्रक्रिया असून त्यासाठी विशिष्ट वेळेची मर्यादा नाही.पंरतु, ही सुनावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी विधिमंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कट्टर समर्थक आमदार दिलीप लांडे आता नॉट रिचेबल आहेत. आमदार लांडे यांचा फोन लागत नाही, ते नेमके कुठे गेले, हाच सगळ्यांना प्रश्न पडला आहे. आमदार लांडे हे मुंबईतील चांदिवलीचे आमदार आहेत. आमदार लांडे हे एकनाथ शिंदे गटात सामिल होणार, असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


