श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांना प्रथमच तैलाभिषेक करण्याची परवानगी

0
118

नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे देश-विदेशातील भाविक दररोज मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.येथील चौथरा भाविकांना खुला तर झालाच, शिवाय महिलांना प्रथमच तैलाभिषेक करण्याची परवानगी देण्यात आली.पूर्वी सर्व भाविकांना चौथऱ्यावर जाऊन तैलाभिषेक करता येत होता. मात्र,भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी २०१५ मध्ये महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळावा या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी भाविकांना केवळ पादुकांपर्यंत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता.

शिंगणापूर येथे शनिदेव स्वयंभू पाषाणरूपात विराजमान आहेत. मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची आहे. शनिदेव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहेत. या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही. मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. देवदर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते. शनिदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी येथे रोज हजारो लिटर तिळाचे तेल अर्पण केले जाते. पुरुष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात आणि मूर्तीवर तेल अर्पण करून प्रदक्षिणा घालतात. शनी बालब्रह्मचारी असल्याने महिला दुरूनच दर्शन घेत असत. चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास महिलांना मनाई होती.

आता विश्वस्त मंडळाची बैठक १८ जून रोजी घेण्यात आली त्यावेळी पुरुषांसोबतच महिलांनाही तैलाभिषेक करण्यास प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यासाठी ट्रस्टची ५०० रु. ची पावती घ्यावी लागेल, असे विश्वस्त मंडळाने जाहीर केले आहे . या निर्णयाची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here