सागरी किनारा म्हणजेच कोस्टल रोडचे काम वेगाने पुढे सरकत असून पावसाळ्यातदेखील पातमुखे ( आऊटफॉल), पंपिंग, खुले नाले यावाटे साचलेल्या पाण्याचा निचरा कशा पद्धतीने वेगाने केला जातो याविषयी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेकडून आढावा घेतला व सूचना दिल्या. पुराच्या पाण्याचा निचरा होऊन कोस्टल रोड कामातही बाधा येणार नाही तसेच नागरिकांनाही त्रास होणार नाही यासाठी यंत्रणा उभारली असल्याची माहिती यावेळी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादरीकरणाद्वारे दिली.
१०.५८ किमीच्या या सागरी मार्गाचे काम ३६ टक्के पूर्ण झाले असून या प्रकल्पावर एकूण १२ हजार ७२१ कोटी खर्च येणार आहे. प्रत्येकी तिहेरी मार्गाचे दोन मोठे बोगदे यात बांधण्यात येत आहेत. १५. ६६ किमीचे इंटरचेंजेस मार्गदेखील असणार आहेत. आतापर्यंत बोगदा खणण्याचे काम ९ टक्के, रिक्लेमेशन ९० टक्के, सागरी भिंत ६८ टक्के अशी कामाची प्रगती आहे.प्रियदर्शिनी पार्क, चौपाटी, वरळी सी फेस अशा ठिकाणी एकंदर ७७ पातमुखे ( आऊटफॉल) असून त्यातील ४३ हे समुद्रकिनाऱ्याला समांतर असे आहेत. सर्व पातमुखांची व्यवस्थित साफसफाई करण्यात आली आहे. अमरसन्स इंटरचेंज, हाजी अली इंटरचेंज, चौपाटी याठिकाणी पुरेशा क्षमतेचे पंप्स बसविण्यात आले आहेत. कोस्टल रोडला लागून १५ ठिकाणी असे ६३ पंप्स आहेत.