संपूर्ण जगभरात चिंतेचा विषय झालेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा कर्नाटक व गुजरातपाठोपाठ महाराष्ट्रातही शिरकाव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या कल्याण-डोंबिवलीच्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे.देशभरात सध्या ओमिक्रॉन सदृश लक्षणे असलेले जवळपास ५६ रुग्ण असून, त्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
राज्यातील डोंबिवलीचा हा पहिला नवीन विषाणूचा रुग्ण आहे. या तरुणाला अत्यंत सौम्य लक्षणे असून घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही, पण काळजी घ्या, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कोरोनाचे नियम पाला.अनावश्यक बाहेर जाणे टाळा,चेहऱ्यावरील मास्क घरातून बाहेर पडताना लावा.तो नेहमी नाक आणि तोंड झाकलेल्या स्थितीत असेल याची दक्षता घ्या.स्वच्छतेचे पालन करा. आताचच गुजरातमध्येही आणखी एक रुग्ण सापडला असल्याचे वृत्त हाती आले असून देशातील ओमिक्रॉन व्हेरिएंटची संख्या आता ४ वर गेली आहे.
२४ नोव्हेंबर रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला. तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण-डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १२ अतिजोखमीच्या लोकांचा, तसेच या लोकांच्या संपर्कात आलेल्या २३ कमी जोखमीच्या सहवासितांचा शोध घेण्यात आला असून त्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.याशिवाय या तरुणाने दिल्ली ते मुंबई प्रवास ज्या विमानाने केला, त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांचीदेखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासीतांचा शोध घेण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
गुजरातमधील जामनगर येथील व्यक्ती ओमिक्रॉन बाधित झाल्याचे तिच्या चाचणीतून समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेतून ही व्यक्ती परतली आहे. त्यानंतर या व्यक्तीची कोविड चाचणी केली होती. नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी आला असून, त्यात त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. गुजरातमधील ही व्यक्ती दोन दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिका येथून परतली होती. विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या रुग्णाला विलगीकरणात ठेवले. या अगोदर कर्नाटकात ओमिक्रोनचे २ रुग्ण सापडले.
देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. त्यातही ओमिक्रॉनसाठी जागतिक आरोग्य संघटनेने जे देश हाय रिस्क श्रेणीत टाकले आहेत तिथून येणा-या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.