सिंधुदुर्गमधील मालवण कन्या श्रिया परबने लेबनान येथे पार पडलेल्या मिस टुरीझम युनिव्हर्स – 2021 स्पर्धेत विजय पटकावला आहे. आशियामधील 22 देशांच्या राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तिने देशाचं प्रतिनिधित्व केल आहे. या स्पर्धेत ‘मिस टुरिसम युनिव्हर्स आशिया 2021’ हा किताब पटकावून श्रियाने सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. यासाठी तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रियाने तिच्या यशाचे सर्व श्रेय तिचे पालक, तिचे मार्गदर्शक, प्रशिक्षक ऋषीकेश मिराजकर यांना दिले आहे.
श्रिया परब ही मुळची सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील आहे. मुंबई येथे ऑगस्ट 2021 मध्ये तिने मिस ‘तियारा’ स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत देशाभरातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिला लेबनॉनमध्ये मिस टुरिसम युनिव्हर्स आशिया 2021 स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. श्रियाच्या या यशाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
श्रियाने पहिल्या दिवसापासूनच जोरदार तयारी करून प्रतिस्पर्धकांच्या मनात धडकी भरवली होती. चाणाक्ष बुद्धिमत्ता आणि सर्वाना घायाळ करणारं सौंदर्य याच्या जोरावर श्रीयाने अंतिम फेरीचं आव्हान देखील यशस्वी पेललं. श्रियाच्या सादरीकरणाने परीक्षकांची मनं जिंकली आणि त्यासोबत ‘मिस टुरिसम युनिव्हर्स आशिया 2021’ किताब देखील तिने आपल्या नावावर केला.
श्रिया 2017 मध्ये झालेल्या मिस अप्सरा स्पर्धेत अंतिम विजेती ठरली होती. तिने मिस एशिया पॅसिफिकमध्ये श्रियाने रनरअपचा किताब पटकावला होता.मुंबई येथे ऑगस्ट 2021 मध्ये तिने मिस तियारा स्पर्धा जिंकली आणि आता मिस टुरीझम युनिव्हर्स 2021 या स्पर्धेमुळे श्रियाने जगभरात देशाचे नाव मोठे केले.