ओरोस- मुस्लिम समाजाच्या विकासासाठी धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अल्पसंख्यांक विकास विभाग यांच्याकडून अनुदान योजना राबवली जाते.
या योजनेचा लाभ घेण्यास संबंधित शाळा, संस्थामध्ये किमान 70 टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी (मुस्लिम, ख्रिश्चन, शिख बौध्द, पारसी, जैन ) शिक्षण घेत आहेत. तसेच अपंगाच्या शाळामध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिक्षण घते आहेत. अशा शाळा,संस्था पात्र असतील. जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक ) यांच्या मार्फत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. 31 जुलै 2022 पर्यंत सादर करावीत.
विहित अर्जाचा नमुना याबाबतचा अधिक माहितीसाठी www.sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुदतीनंतर प्राप्त अर्जाची दखल घेण्यात येणार नाही. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी, संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.


