प्रतिनिधी – दोडामार्ग / सुमित दळवी
दोडामार्ग शहरात नळपाणी योजनेला इलेक्ट्रिक पंप बसवून पाहिजे त्या प्रमाणात पाणी खेचले जात असल्याचा खुलासा करत वेळीच पंप काढून सुधारणा करा अन्यथा अशा नळ धारकांवर कठोर कारवाई केली जाईल असा कडक इशारा कसई दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिला आहे.
बऱ्याच ठिकाणी थेट नळ योजनेच्या पाईप लाईनला इलेक्ट्रॉनिक पंप, प्रेशर पंप बसवून आपल्याला हवं तसं पाणी घेणाऱ्या महाभागांमुळं शहराच्या पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत अशी खळबळजनक माहिती देत संबंधितांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी नगराध्यक्ष चव्हाण यांनी आज थेट पत्रकार परिषद घेतली.
यावेळी उपनगराध्यक्ष देविदास गवस उपस्थित होते. काही ठिकाणी आपण असे प्रकार प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे अशाना आम्ही आता एक संधी देत आहोत, मात्र यापुढे आमची टीम पाहणी करून तसा प्रकार करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. तर नवीन विहीर व पाईप लाईन जोडणीसाठी येत्या सोमवारपासून पुढील तीन ते चार दिवस शहरात पाणी पुरवठा बंद राहील अशी माहिती देत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन चव्हाण यांनी केलं आहे.


