सिंधुदुर्ग: महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापिक सिंधुकन्या लोक संचलित साधन केंद्र, मालवण नगर परिषद, अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापीत स्वराज्य वस्तीस्तर रेवतळे येथील संघाच्या महिलांकडून सिंधुदुर्ग किल्ल्यावर साफ-सफाई करण्यात आली. वायरी – भूतनाथ ग्रामपंचायतीने ग्रास कटर उपलब्ध करून दिले होते.
सर्वप्रथम किल्ल्याची साफ – सफाई करण्यासंदर्भात अध्यक्ष संजना मांजरेकर आणि सहकारी सदस्य यांनी एक दिवस आधी किल्ल्यावर भेट देऊन किल्ल्यावरील समितीशी चर्चा केली. त्याचबरोबर वायरी ग्रामपंचायत यांचेही सहकार्य मिळण्याबाबत मागणी केली. त्यानंतर काल सिंधुदुर्ग किल्ल्यावरील मंदिर, बुरूज, पायवाटा, विहीर भोवतालची साफ – सफाई करून एक स्वच्छतेचा वेगळा संदेश आणि प्रेरणा दिली. वाढलेल्या गवताआड गेलेल्या विहिरी स्वच्छतेनंतर पर्यटकांसाठी पाहण्यास उपलब्ध झाल्या. यासाठी वायरी ग्रामपंचायतीने ग्रास कटर उपलब्ध करून दिला होता. त्याचबरोबर महिलांनीही साधनसामग्री उपलब्ध केली होती.
माविमचे जिल्हा समन्वयक नितीन काळे यांनी स्वच्छतेबाबत आणि प्रशिक्षण देण्याबाबत माहिती दिली. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनीही महिलांचे कौतुक करून हा उपक्रम इतरांना प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. यावेळी सीएमआरसी सिंधुकन्याच्या व्यवस्थापक गिता चौकेकर, क्षेत्रीय समन्वयक खेमराज सावंत, सहयोगिनी सायली कांबळी उपस्थित होत्या. हरिश्चंद्र मांजरेकर यांनीही या स्वच्छता मोहिमेस मदत केली. या मोहिमेत स्वराज्य वस्तीस्तर रेवतळे अंतर्गत समाविष्ट एसएचजीमधील महिला, एएलएफ व संकल्प सीएलएफचे सदस्य तसेच कटुंबातील सदस्यही सहभागी झाले होते. रुद्र पाडावे या छोट्या मुलाने खूप मोठी मदत केली. रुद्र पाडावे याने किल्ल्यावरील साफ-सफाईसाठी विहिरीतून पाणी काढण्यापासून अन्य किल्ल्यावरील लागणाऱ्या कामासाठी मोठी मदत केली. आगदी सुरुवातीपासून तो हिरिरीने आणि उत्साहाने सहभागी झाला होता. साहित्याची ने-आण करण्यातही त्याने मोलाची मदत केली असे सांगून अध्यक्ष मांजरेकर यांनी त्याचा पुष्प देऊन सत्कार केला.