सिंधुदुर्ग: केंद्रिय अन्न सुरक्षा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी संपूर्ण देशातील जनतेच्या आहाराच्या सवयींमध्ये स्थानिक गरजांनुसार आवश्यक बदल करण्याच्या अनुषंगाने “ईट राईट इंडिया” हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून राज्य शासनाने राज्य स्तरीय आणि जिल्हा स्तरीय समिती स्थापन केली आहे. जिल्हास्तरीय समिती ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली असून त्यामध्ये सदस्य म्हणून पुरवठा, पोलीस, कृषी, शिक्षण, महिला व बालकल्याण, जिल्हा उद्योग व जिल्हा दुग्ध विकास या विभागातील अधिकारी व ग्राहक संस्था, अन्न व्यावसायिक आणि पोषण आहार तज्ज्ञ अशा अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत जिल्ह्याची गरज विचारात घेऊन नागरिकांच्या आहारातील अन्न पदार्थांचे बदलाच्या अनुषंगे वेळोवेळी सर्वेक्षण करणे, शासनाच्या आयुष्यमान भारत, पोषण अभियान आणि स्वच्छ भारत मिशन इत्यादी योजनांच्या संयोगाने नागरिकांत अन्न सुरक्षा व पोषण विषयक जागृती करणे, नागरिकांना अन्न साक्षर करणे त्याचबरोबर जिल्ह्यातील अन्न व्यावसायिकांना योग्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्व-अनुपालनाची संस्कृती निर्माण करणे, तसेच जिल्ह्यातील अन्न व्यावसायिकांच्या व ग्राहकांच्या तक्रारी निराकरण करणे इ. बाबींचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) तु.ना. शिंगाडे यांनी दिली.