ओरोस: जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या नियमांचे पत्र दाखल झाले आहे. सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपरिषद क्षेत्रातील अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता प्रभाग राखून ठेवण्यात आलेले आहेत.
या राखून ठेवण्यात आलेले प्रभाग दर्शविणारा आदेशाचा मसुदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.हा मसुदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर दि. 15 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच या तिन्ही नगरपरिषदांच्या कार्यालयामध्ये नगरपरिषद क्षेत्रातील लोकांच्या माहितीसाठी कार्यालयीन वेळेत खुली ठेवण्यात आली आहे.
या आदेशाच्या मसुद्यात कोणाची हरकत व सूचना असल्यास त्या संबंधितांचे सकारण लेखी निवेदन संबंधित नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या नावे नगरपरिषद कार्यालय येथे मंगळवार दि. 21 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत पोहचेल असे पाठवावे. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच निवडणूक आयोगाच्या दि.9 जून 2022 च्या आदेशानुसार प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.