सिंधुदुर्ग- जिल्ह्यात 70 टक्के लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. तसेच जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असल्याने व ऑक्सिजन सपोर्टेड किंवा आयसीयू बेड 40 टक्के पेक्षा कमी रुग्णानी भरलेले असल्याने जिल्ह्याचा समावेश अ यादीमध्ये केलेला आहे. त्यामुळे मदत व पुनर्वसन विभागाच्या 1 मार्च 2022 रोजीच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात 10 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशांमध्ये अधिक शिथिलता देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
या आदेशात म्हटले आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाकडील दि. 13 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेद्वारे साथरोग अधिनियम, 1897 मधील खंड 2,3 व 4 ची अंमल बजावणी राज्यात सदर अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून सुरु करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाकडील महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील दि. 1 मार्च 2022 रोजीच्या आदेशानुसार वेगवेगळ्या भागातील कोव्हीड -19 ची सद्यस्थिती, त्या भागात असलेली जोखीम, त्याठिकाणची लसीकरणाची स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेली बेडची संख्या या आधारावर कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने नियमांमध्ये शिथिलता देणेबाबत नवीन आदेश जारी केलेले आहेत. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 18 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या 90% लोकांनी लसीचा पहिला डोस, त्याचप्रमाणे 70% लोकांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असल्याने, व ऑक्सिजन सपोर्टेड किंवा ICU बेड 40% पेक्षा कमी रुग्णांनी भरलेले असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश अ यादीमध्ये केलेला आहे. उपरोक्त प्रमाणे वस्तुस्थिती लक्षात घेता राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडील दि. 1 मार्च 2022 रोजीच्या आदेशान्वये पारित केलेल्या आदेशाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कार्यालयाकडून दि. 10 जानेवारी 2022 रोजी पारित केलेल्या आदेशामध्ये अधिक शिथिलता देणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 चे कलम 2 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन मदत व पुनर्वसन विभागाकडील दि. 1 मार्च 2022 रोजीच्या आदेशान्वये ‘अ’ यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सामावेश केलेला असल्याने कोविड-19 विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी
सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता दि. 10 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशान्वये लागू करण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता देवून खालीलप्रमाणे सूचना व निर्देश पुढील आदेश पावेतोपर्यंत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लागू करीत आहे.
Ø पूर्ण लसीकरणाची आवश्यकता i. सर्व आस्थापनांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जे मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक सेवा पुरवतात त्यांचे पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक आहे. ii. सर्व घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक आहे. iii. कोणत्याही सार्वजनिक वाहतूक वापरकर्त्यांचे पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक आहे. iv. मॉल्स, थिएटर, नाट्यगृहे, पर्यटन स्थळे, रेस्टॉरंट्स, क्रीडा कार्यक्रम, धार्मिक स्थळे इ.यांना भेट देणारे अभ्यांगत जेथे सामान्य नागरिक देखील भेट देतात त्यासर्वांचे पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक आहे. v. सर्व सार्वजनिक सेवा ज्यामध्ये इतर नागरिकांशी संवाद साधण्याची शक्यता असते आणि ज्यामध्ये अशा परस्परसंवादामुळे कोव्हीड – 19 विषाणूचा प्रसार होऊ शकतो आणि जेथे कोव्हीड अनुरूप वर्तणूक (CAB) प्रभावीपणे लागू होऊ शकत नाही, अशा ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे व त्या ठिकाणी भेट देणाऱ्या सर्व नागरिकांचे पूर्ण लसीकरण असणे आवश्यक आहे. vi. सार्वजनिक किंवा खाजगी कोणत्याही कार्यालयात किंवा आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी ज्यांचा सामान्य लोकांशी संबंध आहे त्यांचे पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक आहे. vii. कोणत्याही औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक आहे. * सामाजिक/क्रीडा/ मनोरंजन/ शैक्षणिक/ सांस्कृतिक/ धार्मिक/ राजकीय/ विवाह आणि अंत्यसंस्कार यांच्या समावेशासह, उत्सव सबंधित कार्यक्रम आणि इतर मेळावे आणि मंडळे यांना सदर ठिकाणच्या 50% क्षमतेच्या मर्यादेपर्यंत परवानगी असेल. परंतु जेव्हा जेव्हा कोणत्याही कार्यक्रमास 1000 पेक्षा जास्त नागरिकांचा समावेश अपेक्षित असेल तेव्हा सबंधित विभागातील उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील व स्थानिक आपती व्यवस्थापन प्राधिकरण त्यावर वाजवी बंधने घालू शकेल. * महाराष्ट्र शासनाच्या संबंधित प्रशासकीय विभागाच्या कोणत्याही आदेशाच्या अधीन राहून सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू होऊ शकतात. सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रशासनांना ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देण्याच्या हायब्रीड मॉडेल वापरावर भर द्यावा. सर्व प्राथमिक शाळा तसेच अंगणवाड्या आता प्रत्यक्ष रीत्याही सुरू करता येतील. या सर्व संस्था, आस्थापनांनी कोव्हीड अनुरूप वर्तणूक (CAB) चे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. * सर्व प्रशासकीय विभागांसाठी सर्व घरपोच सेवांना परवानगी राहील. Ø सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट्स आणि बार, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाट्यगृहे, पर्यटन स्थळे, मनोरंजन उद्याने इत्यादीं ठिकाणे 100% क्षमतेने सुरु करण्याची परवानगी असेल. * पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींना आंतरराज्य तसेच राज्य अंतर्गत प्रवास करण्यास परवानगी असेल. इतर राज्यांमध्ये ये-जा करणाऱ्या लसीकरण पूर्ण नसलेल्या लोकांना ७२ तासपूर्वीचे चाचणी करून आणलेले निगेटिव्ह RTPCR अहवाल दाखवणे बंधनकारक असेल. * सरकारी आणि खाजगीसह सर्व कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. * सर्व औद्योगिक आणि वैज्ञानिक संस्था पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. * या आदेशामध्ये समाविष्ट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 100% क्षमतेच्या मर्यादेपर्यंत परवानगी असेल. याबाबत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचा निर्णय अंतिम राहील. * जिल्हास्तरावर या प्रशासनामार्फत वारंवार बैठका, किमान आठवड्यातून एक बैठक, घेऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. व कोव्हीड – 19 चा प्रादुर्भाव वाढल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या परवानगीने आणखी जास्त कठोर निर्बंध लादण्याची अनुमती असेल. * जिल्हा शल्य चिकित्सक सिंधदुर्ग व जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. सिंधुदुर्ग यांनी जिल्ह्यातील लसीकरण (दोन्ही डोस) 100 % पूर्ण करणेबाबत लसीकरण मोहीम राबवावी. जिल्ह्यातील लसीकरणाच्या स्थितीच्या बाबतीत सध्यस्थितीत जरी १८ वर्षापेक्षा कमी वय असलेल्यांसाठी लसीकरणाची आकडेवारी आवश्यक केली नसली तरी भविष्यात त्याचा अंतर्भाव केला जावू शकतो. पात्र लोकांनीही सावधगिरीचे डोस (Precautionary Dose) घेण्यात यावेत. सर्व शाळातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली आहे कि नाही याची शिक्षण विभागाने शहानिशा करून घ्यावी. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे. * कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक सिंधदुर्ग व जिल्हा आरोग्य अधिकार जि.प. सिंधुदुर्ग यांनी सध्याची कोविड परिस्थिती, पायाभूत सुविधांची चाचणी इत्यादी सर्व माहिती मोठ्या प्रमाणात लोकांना पुरवावी. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील लोकांना या कार्यात समाविष्ट करून घेण्यात यावे. तसेच कोव्हीड अनुरूप वर्तणूक होत असल्याची खात्री करणेत यावी.
शासन व जिल्हा प्रशासनाचे निर्देशाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित केलेले आदेशातील सर्व निर्देश, सूचना, अटी व शर्तीचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक असेल. कोविड-19 साथरोगसंदर्भाने शासनाचे आदेश, जिल्हा प्रशासनाचे आदेशांमधील अटी, शर्ती, दंडाबाबत निर्देशाचे काटेकोर पालन करणे सर्व संबंधित व्यक्ती, आस्थापना व शासकीय-निमशासकीय विभागांना बंधनकारक असेल. वरील सर्व बाबीमध्ये महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाच्या दि. 1 मार्च 2022 रोजीच्या आदेशामध्ये नमूद कोव्हीड अनुरूप वर्तणुकी संबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात यावे. सदर आदेशाचे पालन न करणारी उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. सदरचा आदेश संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी लागू राहील.