सावंतवाडी प्रतिनिधी –
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी परिवहन विभाग, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग यांनी सीमा तपासणी नाक्यावर एकाच ठिकाणी करावी, अशी सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बांदा येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावरील सभागृहात आढावा बैठकित दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख व्हावी या दृष्टीने बांदा येथे प्रवेशव्दार उभे करावे. चांगल्या सुविधा रेस्टॉरंट, बगीचा उभे करतानांच राष्ट्रीय महामार्ग ॲथोरेटीने एमटीडीसीच्या विभागाबरोबर उद्याच जागेची पाहणी करावी असेही शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले.-
सदर प्रवेशद्वार उभारताना या प्रवेशव्दारावर जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध सुविधा उभाराव्यात. या ठिकाणी माहिती पत्रके वाटण्यासाठी माहिती केंद्र उभे करावे. तसेच जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती एलईडी स्क्रीनवर दर्शवावी. सीमा तपासणी नाक्यावर परिवहन विभाग, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग यांनी एकाच ठिकाणी करावी. त्या वाहनांची जिल्ह्यात कोठेही पुन्हा तपासणी होणार नाही. असे स्टीकर लावावे. बांदा येथील किल्ला पर्यटनासाठी खुला करुन बांदा पर्यटन नकाशावर येईल त्या दृष्टीने नियोजन करावेत. वन विभागाने आंबोली येथे येणाऱ्या पर्यटकांनासाठी पार्किंगची व्यवस्था करावी. पार्किंग पासून धबधब्यापर्यंत पर्यटकांना सोडण्यासाठी बॅटरीवरील वाहनांची सोय करावी. यासाठी माजी सैनिक तरुण वर्गाचे सहकार्य घ्यावे. आंबोली येथील चारही धबधब्यांची पर्यटकांसाठी साखळी करावी. कावळेसादला पोलीस चौकी बांधावी अशा अनेक सूचनाही त्यांनी केल्या..
या बैठकीला यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, एमटीडीसीचे कार्यकारी अभियंता विनय वावधने, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, सहायक वनसंरक्षक वर्षा खरमाटे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, क्षेत्रिय वन अधिकारी विद्या घोडके, तहसिलदार श्रीधर पाटील, सरपंच आक्रम खान उपस्थित होते.


