सिंधुदुर्ग : टोलमाफीसाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात

0
98
टोलमाफीसाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात

ओसरगाव टोलनाक्यावर शिवसेनेच्या वतीने सह्यांची मोहीम सुरु;आमदार वैभव नाईक,संदेश पारकर, सतीश सावंत, संजय पडते यांची उपस्थिती

कणकवली:शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने जिल्हाभरात टोलमाफीसाठी सह्यांची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. कणकवलीत ओसरगाव टोलनाका येथे आज आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर,माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम राबविण्यात आली. एम.एच. झिरो सात नंबर प्लेट असलेल्या गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल माफी मिळावी यासाठी सह्या घेण्यात आल्या. सह्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग वासियांना टोलमाफी व्हायला हवी तसेच जोपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणाकडूनही टोल घेऊ नये अशी भूमिका आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केली.

मुंबई गोवा महामार्गाची अजून बरीच कामे बाकी आहेत. तसेच काही जमीन मालकांना अद्याप मोबदला देखील मिळालेला नाही. मात्र केंद्रसरकराने सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल सुरु करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे रोजच्यारोज ये-जा करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलचा फटका बसणार असल्याने एम.एच. झिरो सात नंबर प्लेट असलेल्या गाड्यांना टोलमाफी होणे गरजेचे आहे. तसेच जोपर्यंत हायवेचे काम होत नाही तोपर्यत टोल वसुली सुरु करू नये, याबाबत आवाज उठविण्यासाठी हि सह्यांची मोहीम राबविली आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील गावागावात ही मोहीम राबविणार असल्याचे संदेश पारकर, संजय पडते, सतीश सावंत यांनी सांगितले.याप्रसंगी शिवसेना जिंदाबाद..! सिंधुदुर्ग वासियांना टोल माफी मिळालीच पाहिजे..! मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा विजय असो..! अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, महिला जिल्हा संघटक निलम पालव, अँड.हर्षद गावडे, शेखर राणे, कन्हैया पारकर, प्रमोद मसुरकर, वैदेही गुडेकर, तेजस राणे, विलास गुडेकर, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले. सुदाम तेली, दिलीप भोगले, रुपेश आमडोसकर, आना भोगले, महेश कोदे, पांडुरंग कारेकर, प्रभाकर सावंत, वैभव मालंडकर, अरुण परब, बाबु केनी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here