शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी जिल्हा कारागृहातील बंदीजनांनी सादर केल्या संतरचना
प्रतिनिधी – संजय भाईप/सावंतवाडी
‘नाम गाऊ नाम घेऊ’ या जगद् गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने जिल्हा कारागृह दुमदुमले. निमित्त होते कारागृहातील बंदीजनांसाठी आयोजित केलेल्या भजन आणि अभंग स्पर्धेचे! ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘नाम गाऊ नाम घेऊ’ या संत रचनांनी भक्तीरसाची अनुभूती आली तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील ‘एकच राजा इथे जन्मला’ या गीताने वीररसाची अनुभूती आली.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सावंतवाडी जिल्हा कारागृहातील बंदीजनांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत संतरचना सादर केल्या.
जिल्हा कारागृह अधीक्षक संदीप एकशिंगे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे सदस्य अमित सामंत, भास्कर परब, पुंडलिक दळवी, संगीत प्रशिक्षक हार्दिक शिगले, महेश तळगावकर तसेच शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, हभप अच्युत महाराज कुलकर्णी, विश्वस्त विवेक थिटे, संजीव मिसाळ, शंकर धुमाळ आदी उपस्थित होते
संकटांचा मार्ग मोकळा
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या भजन स्पर्धेमुळे संकट आणि चिंतामुक्तीचा मोकळा झाला, अशा भावना बंदी प्रल्हाद मांजरेकर यांनी व्यक्त केल्या.
भजन स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे आई-वडिलांकडून लहानपणी मिळालेल्या चांगल्या शिकवणुकीची आठवण झाली. भविष्यात चांगल्या मार्गाने वाटचाल करू अशी ग्वाही बंदी सुरेश धामापुरकर यांनी दिली.
आयुष्याचा मार्ग सुकर करतील
कोकणची माती नेहमची संत परंपरेला जपणारी आहे. संत परंपरेचा वारसा या भजन स्पर्धेच्या माध्यमातून बंदीजन जपतील आणि उर्वरित आयुष्याचा मार्ग सुकर करतील असा विश्वास आहे.-संदीप एकशिंगे, अधीक्षक, जिल्हा कारागृह, सावंतवाडी
महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांना आणि स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ संघांना साहित्यभेट
स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कारागृहातील संघांला सौ. दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फेम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी 82 पुस्तकांचा संच देण्यात आला.


