सिंधुदुर्ग : नांदरुखच्या गिरोबा देवालयाच्या तलावाचे जलसिंचन मोहिमेंतर्गत खोदाई आणि सुशोभीकरणाचे काम सुरू

0
155
नांदरुखच्या गिरोबा देवालयाच्या तलावाचे जलसिंचन मोहिमेंतर्गत खोदाई आणि सुशोभीकरणाचे काम सुरू

भाविकांनी सढळ हस्ते देणग्या देण्याचे आवाहन
भाऊ चव्हाण यांच्याकडून ५० हजारांची देणगी

कणकवली: दि. १५- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या मालवण तालुक्यातील नांदरुखची ग्रामदेवता श्री गिरोबा देवालयाच्या पाठीमागे असलेल्या ऐतिहासिक तलावाचे जलसिंचन मोहिमेंतर्गत ऊर्जितावस्था आणण्यासाठीच्या खोदाईच्या कामाला आणि सुशोभीकरणाच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे. हे काम भाविकांच्या उदारहस्ते देणग्यांतून साकारण्यात येत आहे. तरी मालवणसह एकूण नऊ गावांची मुळ ग्रामदेवता असलेल्या भाविकांनी या कामासाठी सढळ हस्ते आर्थिक देणग्या द्याव्यात, असे आवाहन सरपंच दिनेश चव्हाण यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ला उभारताना गिरोबा मंदिरालगत मुख्य बाजारपेठ उभारली होती. या गावातून महाराज घोड्यावरून किल्ल्याच्या बांधकामाच्या ठिकाणी जा ये करीत होते. एवढे ऐतिहासिक महत्त्व या गावाला आणि ग्रामदेवतेला आहे, एक जागरूक देवस्थान म्हणून गिरोबाची ख्याती आहे, अशी माहिती देऊन त्यांनी मालवण शहरासह वायरी, तारकर्ली, देवबाग, कुंभारमाठ, घुमडे, कातवड, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ या आताच्या नऊ गावांचा मिळून नांदरुख गाव वसला होता. त्यामुळे या सर्वं गावांची मुळ ग्रामदेवता देव गिरोबा आहे. आता अलिकडील पिढीला हे ज्ञात झाले आहे. त्यामुळे जत्रोत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी होत असते.

यापूर्वी या देवालयाचा परिसर भाविकांच्या उदार देणग्यांतून सुशोभित करण्यात आला आहे. त्यामुळे शालेय सहली या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. देवालया समोर असलेल्या तळीमध्ये मुबलक पाणी असते. तलावाचे समतल खोदाईचे आणि सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या देवालयाचे पर्यटनदृष्ट्या महत्व वाढणार आहे, अशी माहिती देऊन चव्हाण यांनी हे काम जेसीपी आणि काॅम्प्रेसरच्या सहायाने करण्यात येत आहे. या कामासाठी प्रति तास रुपये १२०० एवढा खर्च येत आहे. अंदाजे १०० तास खोदाईचे काम अपेक्षित आहे. कामाच्या दुसऱ्या टप्प्यात जलसाठा वाढावा या द्दुष्टीने आर. सी. सी. भिंत उभारण्यास सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

नांदरुख गावचे सेवाभावी भाविक भाऊ बापू चव्हाण यांनी या कामासाठी स्वत:चे योगदान म्हणून रुपये ५०,०००/_ जाहीर केले आहेत. तसेच पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांनी स्वत:चे योगदान देण्याचे कबूल केले आहे, अशी माहिती देऊन चव्हाण यांनी देणगीदारांनी प्रति तास रुपये १२००/- च्या पटीत योगदान देणे अपेक्षित आहे. देणग्या संगम श्रीकृष्ण चव्हाण यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा चौके मधील बचत खाते क्र. ०३९४०००००००१७४७ आणि आय. एफ. एस. सी. क्र. SIDC0001039
या खात्यात भरणा करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here