मुबंई- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक काळात झालेल्या संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. याप्रकरणातील नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने आज नाकारला आहे. मात्र मनिष दळवी यांचा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर नितेश राणे सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान संतोष परब हल्ला प्रकरणात अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण उच्च न्यायालयाकडूनही नितेश राणे यांना कोणताही दिलासा मिळाला नसून त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यात आला आहे. माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयात निकालाला आव्हान जाण्यासाठी दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची नितेश राणेंच्या वकिलांची उच्च न्यायालयात मागणी केली आहे.
अटकेची टांगती तलवार असताना गेल्या अनेक दिवसांपासून राणे नॉटरिचेबल होते, नितेश राणे कुठे आहेत? असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जात होता. पण गेल्या आठवड्यात गुरुवारी नितेश राणे तब्बल १५ दिवसांनी सर्वांसमोर प्रकटले होते.